न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०१९) :- पुणे महापालिकेत एकवेळ भाजपची सत्ता येईल परंतु, पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता येणार नाही, असा विश्वास भल्या-भल्या जाणकारांनी त्यावेळी व्यक्त केला होता. मात्र, भाजपने पिंपरी चिंचवड महापालिका काबीज केल्यानंतर त्या जाणकारांनी तोंडात बोट घातली. पिंपरी चिंचवड शहरवासियांनी मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला पर्यायाने शरद पवार घराण्याला पराभवाचा मोठा झटका देऊन, घरी बसवले. हा आजवरचा मोठा इतिहास आहे, असे पुण्याचे माजी पालकमंत्री व नवनिर्वाचित खा. गिरीष बापट यांनी पिंपरीत सोमवार (दि. १०) रोजी कार्यक्रमात बोलताना वक्तव्य केले होते.
या वक्तव्याचा शहर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांनी खरपूस समाचार घेत, खा. बापटांवर पलटवार केला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना कस्पटे म्हणाले की, शहरासाठी गेल्या पाच वर्षात भाजपाचे योगदान? हे आधी सांगा, मग पवारांना संपविण्याची भाषा करा. काही ना काही आमिषे दाखवून, प्रसंगी बळाचा वापर करून, धाकदपटशा करून, राष्ट्रवादी व इतर विरोधी पक्षातील नेतेमंडळीना भाजपमध्ये आयात करायचे आणि जे भाजपाचे निष्ठावंत आहेत त्यांच्या उरावर बसवून, सत्ता उपभोगायची हा खेळ जास्त दिवस चालत नाही.
बापटसाहेब…. खरच तुमच्या भाजपामध्ये दम असेल तर, निष्ठावंत मोठे करून दाखवा. त्यांना आमदार, खासदार करून दाखवा. बापटसाहेब EVM मुळे असं बोलत असाल तर, मान्य. पण, जर तुम्ही लोंकामुळे बोलत असाल, तर तो तुमचा खुप मोठा गैरसमज आहे. जर खरंच पिंपरी चिंचवड शहर भाजपात फार मोठे मान्यवर असतील तर, त्यांना डावलून तुम्हाला पालकमंत्री आयात का करावा लागतो? याचे उत्तर आधी द्या. मग पवारांवर टीका करा. सत्ता येण्याआधी पवार साहेबांच्या तुकड्यावरच तुम्ही व तुमच्या त्राण नसलेल्या पक्षाने गुजराण केली, हे विसरू नका.











