न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०१९) :- कुदळवाडी भागामध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरीक व लहान मुलांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी सेवादलाचे अध्यक्ष आनंदा यादव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, कुदळवाडी परिसरातील चौका-चौकात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कचराकुड्यांच्या आसपास ही संख्या मोठ्या प्रमाणावर आढळते. या परिसरातील तरूण, नागरीक मॉर्निग वॉक, शतपावलीसाठी जात असताना अचानक ही कुत्री त्यांच्या अंगावर धावून येतात.
दुचाकी चालविताना ही कुत्री मागे लागल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडले आहेत. गेल्या दहा दिवसांत या परिसरातील अनेक जणांचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या त्रासापासून वाचण्याकरिता नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करुन, या परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त आयुक्तांनी करावा, असे या निवेदनात यादव यांनी म्हटले आहे.


















