न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०१९) :- भोसरीतील अण्णासाहेब मगर बँकेच्या अध्यक्षपदी राजेश सस्ते व उपाध्यक्षपदी मनोज बोरसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सभेचे अध्यक्षपद बी. टी. लावंड, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर (अध्यासी अधिकारी) यांनी भूषवीले.
बँकेच्या अध्यक्षपदासाठी राजेश दत्तात्रय सस्ते यांचे नावाचा प्रस्ताव संचालक ॲड. घनशाम खलाटे यांनी सभेपुढे मांडला. यास बँकेचे संचालक शंकर मेटकरी यांनी यास अनुमोदन दिले. तसेच बँकेच्या उपाध्यक्ष पदासाठी मनोज रघुनाथ बोरसे यांचे नावाचा प्रस्ताव शंकर मेटकरी यांनी सभेपुढे मांडला व यास संचालक गणेश पवळे यांनी अनुमोदन दिले. वरील दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झालेने अध्यासी अधिकारी यांनी राजेश सस्ते यांची अध्यक्षपदी व मनोज बोरसे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
यावेळी माजी अध्यक्ष नंदकुमार लांडे तसेच संचालक ॲड. घनशाम खलाटे, सुलोचना भोवरे, गणेश पवळे, शंकर मेटकरी, विजय गवारे, सविता मोहरुत, सोनल लांडगे, दिपक डोळस, सीए अमेय दर्वे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नुतन अध्यक्ष राजेश सस्ते यांनी संचालक मंडळाने दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून सातत्याने बँकेची सर्वांगीण प्रगती करण्याचे प्रयत्न केले जातील, असे आपल्या मनोगतात सांगितले. तसेच उपाध्यक्ष मनोज बोरसे म्हणाले की, सभासद, ठेवीदार आणि कर्जदार यांच्यात बँकेबद्दल विश्वास वाढीसाठी व सर्व सहका-यांच्या मदतीने बँकेची उत्तम प्रगती करणेबाबत मी नेहमी प्रयत्नशील राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.











