न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०१९) :- भाजपच्या प्रकाश मेहता, सुभाष देशमुख, पंकजा मुंडे, विनोद तावडे, राम शिंदे, संभाजी पाटील निलंगेकर, सुभाष देसाई यांसारख्या अर्ध्या डझन पेक्षा जास्त मंत्र्यांवर विविध प्रकरणामध्ये भ्रष्टचाराचे आरोप झाले. परंतु, मुख्यमंत्र्यांनी स्वतः न्यायालय असल्यासारखे सर्वाना क्लीन चिट दिली. तसेच भ्रष्टचारी मंत्र्यांना त्यांनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते मुख्यमंत्री आहेत की, “क्लीनचिट” मंत्री असा प्रश्न जनता विचारत आहे.
भाजपचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दक्षिण मुंबईतील इमारत पुनर्विकास योजनेत विकासकाचा मोठय़ा प्रमाणावर फायदा होईल, अशा पद्धतीने यांनी निर्णय घेतला होता, असा आरोप त्यांच्यावर झाला होता. दोन वर्षांपूर्वी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांनी आवाज उठविल्यावर या आरोपाची लोकायुक्तांकडून चौकशीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार लोकायुक्त निवृत्त न्यायमूर्ती एम.एल. टहलीयानी यांनी चौकशी पूर्ण झाल्यावर गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.
या गैरव्यवहार प्रकरणी प्रकाश मेहता यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अपना वतन संघटनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागणीसाठी शनिवार दि. १५/०६/२०१९ रोजी सकाळी ११. ०० वाजता पिंपरी येथील भारतीय जनता पक्षाच्या मुख्य कार्यालयावर अपना वतन संघटनेच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहेत, असे अपना वतन संघटनेने निवेदनाद्वारे म्हटले आहे.


















