- इंधन खर्चात भरघोस वाढ…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.०१ एप्रिल २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील पदाधिकारी व वर्ग-१ दर्जाच्या वाहन देय अधिकाऱ्यांना खाजगी वाहन वापरासाठी मिळणाऱ्या प्रतिपूर्तीमध्ये वाढ करण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या स्थायी समिती सभेत आयत्या वेळेत आलेल्या या प्रस्तावाला सभापती अभिषेक बारणे यांनी मंजुरी दिली.
महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या २०१७ मधील धोरणानुसार पदाधिकारी व अधिकाऱ्यांना शासकीय कामकाजासाठी स्वतःचे वाहन वापरण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी पेट्रोल वाहनासाठी दरमहा ३९,५६० रुपये, तर डिझेल वाहनासाठी ३६,५६० रुपये प्रतिपूर्ती निश्चित करण्यात आली होती.
मात्र, गेल्या काही वर्षांत वाहनांची किंमत, इंधन दर, देखभाल खर्च व वाहनचालकांचे वेतन यात मोठी वाढ झाली आहे. ही वाढ लक्षात घेऊन आता सर्व संबंधित पदाधिकारी व अधिकाऱ्यांना दरमहा ५० हजार रुपये प्रतिपूर्ती देण्याचा प्रस्ताव पुढे आला.
हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महापालिका सभेपुढे ठेवण्यात आला होता. त्यास स्थायीची मंजुरी मिळाल्याने पदाधिकारी व अधिकाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.










