न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०२ एप्रिल २०२५) :- चाकण एमआयडीसी परिसरात बुधवारी (दि. १ एप्रिल) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका हॉस्पिटलजवळ एकावर जीवघेणा हल्ला झाला. चिंचवड येथील मजूर रेवण कावळे (वय ४५) यांच्यावर जनार्धन तुकाराम पांचाळ (वय ५२)
याने ‘तू मला काय आंडू पांडू समजलास का, तू मला ओळखले नाही व मी पारधी आहे. पारध्यासोबत वाद घालतो का तुला जिंवत सोडत नाही, तुला मारून टाकतो’ असे म्हणून कामानिमित्त नाणेकरवाडीत आलेल्या कावळे यांच्यावर आरोपीने मागून हल्ला करत डोक्यावर प्रहार केला.
बचाव करताना त्यांच्या मनगटावर व बरगडीवर गंभीर जखमा झाल्या. घटनेनंतर परिसरात घबराट पसरली असून नागरिकांनी दुकाने बंद केली. आरोपीने उपस्थितांना धमकावत तेथून पळ काढला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सपोनि धायगुडे करत आहेत.










