न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०३ एप्रिल २०२६) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील ६७४ गावांमध्ये पंतप्रधान आवास योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी विशेष ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, यासाठी प्रशासकीय यंत्रणा सक्रिय करण्याचे निर्देश महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.
अभियांत्रिकी आढावा बैठकीत तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी ‘शहरस्तरीय तांत्रिक कक्ष’ (CLTC) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ‘लाभार्थी आधारित बांधकाम’ (BLC) आणि ‘परवडणारी घरे’ (AHP) योजनांसाठी तज्ज्ञ संस्थांची नियुक्ती होणार आहे.
जमिनीच्या उपलब्धतेसाठी नऊ तालुक्यांत शासकीय जागांचा शोध घेतला जाणार असून प्रत्येक मतदारसंघात किमान एक गृहप्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. याशिवाय ‘PMAY-2’ अंतर्गत गावठाण भागातील प्रस्तावांनाही मंजुरी देण्याचे संकेत देण्यात आले असून, यामुळे ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांचे घराचे स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे.










