- ‘परिमंडळ ४’चाही प्रस्ताव; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०३ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पाच नवीन पोलीस ठाणी आणि स्वतंत्र ‘परिमंडळ ४’ स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे.
सध्या आयुक्तालयात १८ पोलीस ठाणी व २ परिमंडळे कार्यरत असून, वाढत्या शहरी विस्तारामुळे हिंजवडी, भोसरी, चिखली, तळेगाव दाभाडे भागात पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी विलंब होत होता. ही समस्या सोडवण्यासाठी पिरंगुट, जांभे, पिंपळे सौदागर, मोशी आणि देहूगाव येथे नवीन पोलीस ठाणी प्रस्तावित केली आहेत.
यासोबतच ‘परिमंडळ ४’साठी उपआयुक्त स्तराचा अधिकारी व आवश्यक मनुष्यबळ नियुक्त केले जाणार आहे. एकूण ९१३ नवीन पदांची निर्मिती प्रस्तावित असून, त्यामुळे पोलीस यंत्रणेची कार्यक्षमता वाढणार आहे. प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर शहरातील सुरक्षाव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.










