- अशा फसव्या ‘नोकर भरती’च्या मागे आपणही लागलात का?..
- पिंपरीत घडला असाच काहीसा प्रसंग; अनं पुढे ठेवला डोक्यावर हात…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०४ एप्रिल २०२६) :- आजच्या काळात सरकारी नोकरी म्हणजे अनेकांसाठी स्थैर्य, सन्मान आणि सुरक्षित भविष्य यांचे प्रतीक बनले आहे. मात्र, हीच मानसिकता काहीवेळा लोकांना चुकीच्या मार्गावर नेते आणि फसवणुकीसारख्या घटनांना आमंत्रण देते.
नोकरी मिळविण्याच्या हव्यासापोटी अनेकजण पडताळणी न करताच कुणावरही विश्वास ठेवतात आणि त्याचा गैरफायदा फसवेगिरी करणारे घेतात. अशा घटना केवळ एक गुन्हा नसून समाजातील वाढत्या प्रवृत्तीचे द्योतक आहे. सरकारी नोकरीच्या मागे लागलेल्या तरुणाईला शॉर्टकटचा मोह होतो आहे. मेहनत, पात्रता आणि योग्य प्रक्रियेऐवजी “वशिला” किंवा “पैसे” यांच्या जोरावर नोकरी मिळवण्याची मानसिकता आज वाढत चालली आहे. सरकारी नोकरी मिळविण्याची इच्छा चुकीची नाही, पण ती मिळविण्याचा मार्ग प्रामाणिक असणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा अशा फसवणुकीच्या घटना वाढत राहतील आणि मेहनती तरुणांचे स्वप्न उद्ध्वस्त होईल.
नेमकी घटना काय?…
पिंपरीतील मोरवाडी परिसरात पीडित जितेंद्र रसाळ (वय ३८) यांची ओळख असलेल्या सुरज पाटील (इंदापुर, जि.पुणे) नामक इसमाने त्यांना समाजकल्याण विभागात वरिष्ठ निरीक्षक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. तसेच त्यांचा पुतण्या सत्यम याच्यासह विक्की यांना नागपुर जेल पोलीसमध्ये शासकीय नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. विश्वास संपादन करून त्यांच्याकडून तब्बल ४३ लाख ८१ हजार ९८५ रुपये उकळले. मात्र नोकरीचे कोणतेही आश्वासन पूर्ण न केल्यामुळे त्याने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आता फसवणूकप्रकरणी संत तुकारामनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणातील आरोपी सुरज पाटील यास अद्याप पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.
यावर उपाय काय?…
- कोणतीही सरकारी नोकरी अधिकृत जाहिरात आणि प्रक्रिया यांच्याद्वारेच मिळते, हे लक्षात ठेवणे आवश्यक.
- नोकरीसाठी पैसे मागणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नये.
- संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच माहिती पडताळावी.
- संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार करावी.
- तरुणांनी शॉर्टकटऐवजी कौशल्य आणि अभ्यासावर भर द्यावा.










