- ३ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. ०५ एप्रिल २०२६) :- तळेगाव दाभाडे येथील दीर्घकाळ प्रलंबित पाणीप्रश्नावर मोठा दिलासा मिळाला असून यशवंत नगर येथे ३ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण आज उत्साहात पार पडले. हा समारंभ सुनील शेळके यांच्या उपस्थितीत झाला.
नगरपरिषदेच्या सुमारे १.३५ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे सत्यकमल कॉलनी, म्हाडा कॉलनी, रेनो कॉलनी, स्टेशन चौक आणि यशवंत नगर परिसरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम होणार आहे. तसेच चौराई येथील मुख्य प्रकल्पावरील ताण कमी होणार आहे.
स्टेशन परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी करावी लागणारी कसरत लक्षात घेऊन हा प्रकल्प राबविण्यात आल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले. आंद्रा धरणातून बंदिस्त पाईपलाईन योजनेलाही लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे भविष्यात पाणीटंचाईचा प्रश्न पूर्णतः मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. नागरिकांनी समाधान व्यक्त करत आभार मानले.










