- दहा हजार कोटींचा प्रकल्प उभारण्याचं धाडस भाजप दाखवणार?..
- प्रकल्पावरील सविस्तर चर्चेसाठी नगरसेवकांच्या विशेष महाभेची गरज..
- पिंपरी चिंचवडसह उद्योगनगरी चाकण एमआयडीसीच्या आशा पल्लवित…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०६ एप्रिल २०२६) :-निगडी भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक ते चाकण असा सुमारे ४१ किलोमीटरचा मेट्रो मार्ग उभारण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला असून आता पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या निर्णयावर या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) ने या मार्गाचा ४०.९२६ किमीचा सुधारित डीपीआर तयार केला असून त्यात एकूण ३१ स्थानकांचा समावेश आहे.
शहरातील २५ आणि चाकण परिसरातील सहा स्थानकांमुळे हा मार्ग व्यापक ठरणार आहे. सुमारे १०,३८३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पात वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन सहा डब्यांच्या मेट्रोची तरतूद, तसेच मार्गात बदल आणि स्थानकांची वाढ करण्यात आली आहे. भोसरीचा नव्याने समावेश हा या आराखड्याचा महत्त्वाचा भाग ठरतो.
दरम्यान, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर सविस्तर चर्चा करण्यासाठी महापालिकेत विशेष महासभा आयोजित केली जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सत्ताधाऱ्यांनी ठोस भूमिका घेतल्यास प्रकल्पाला गती मिळू शकते; अन्यथा तो पुन्हा रखडण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासन प्रत्येकी १० टक्के निधी देणार असून महापालिकेचा वाटा १५ ते २० टक्के असेल. उर्वरित निधी कर्जाच्या माध्यमातून उभारला जाणार आहे.
सुधारित डीपीआरला मंजुरी देऊन सत्ताधारी पुढाकार घेणार की आणखी सुधारणा सुचवून निर्णय लांबवणार, याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले आहे. हा प्रकल्प शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी गेमचेंजर ठरणार की पुन्हा कागदावरच राहणार, याचा फैसला लवकरच होण्याची शक्यता आहे.
असा आहे सुधारित मार्ग…
निगडी ते चाकण आराखड्यात निगडीतील भक्ती-शक्ती समूहशिल्प चौक, ट्रान्सपोर्टनगर, गणेशनगर, मुकाई चौक, रावेत, पुनावळे गाव, पुनावळे, ताथवडे गाव, ताथवडे, भूमकर चौक, भुजबळ चौक, वाकड, विशालनगर कॉर्नर, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकारामनगर, वल्लभनगर (वायसीएम रुग्णालयाजवळ), गवळीमाता चौक, भोसरी एमआयडीसी, वखार महामंडळ गोदाम चौक, पीआयईसी, मोशीतील भारतमाता चौक, चिंबळी फाटा, बर्गेवस्ती, कुरळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडी, चाकण असा हा मार्ग आहे. सुधारित आराखड्यात भोसरीचा समावेश करण्यात आला आहे.
निगडी ते चाकण मेट्रो मार्गाच्या आराखड्यात तत्कालीन पालकमंत्र्यांसह शहरातील लोकप्रतिनिधींनी काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार सुधारीत आराखडा तयार करण्यात आला आहे. तो महापौरांसह सर्व पदाधिकारी व नगरसेवकांसमोर सादर केला जाईल. त्यांनी मान्यता दिल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
– श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो…










