- धुळीची पिशवी देत ‘आप’चा पालिकेच्या निष्क्रियतेवर संताप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०६ एप्रिल २०२६) :- पिंपळे निलख परिसरातील अनधिकृत आरएमसी (RMC) प्लांट प्रकरण चिघळले असून ‘आप’ने अनोख्या पद्धतीने आंदोलन करत महापालिकेच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त केला. आपचे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी इशारा देत, “महापालिकेने गांभीर्याने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडू,” असे स्पष्ट केले.
ग्रेस्टोन इन्फ्रा आणि कार्निवल इन्फ्रा या दोन प्लॅन्टना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाने सील लावले होते. मात्र, प्लांट चालकाने सील तोडून पुन्हा काम सुरू केल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महावितरणला पत्र देत वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश दिल्यानंतर वीज तोडण्यात आली. तरीही परिसरातील धुळीचा त्रास कमी झालेला नाही, अशी तक्रार आहे.
या पार्श्वभूमीवर संतप्त आप कार्यकर्त्यांनी ‘धुळीची भेट’ देत ड प्रभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. रस्त्यावरची धुळ पिशवीत भरून देत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला.















