- महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक परंपरेचा अनोखा संगम; सहभागी महिलांचे कौतुक…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३१ जुलै २०२६) :- महाराष्ट्र शासनाच्या वतीने तसेच आमदार उमा खापरे यांच्या पुढाकारातून आयोजित ‘नारीशक्ती महोत्सव २०२६’ अंतर्गत पारंपरिक मंगळागौरी कार्यक्रमाचे रंगतदार आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजप युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष अनूप मोरे यांनी उपस्थित राहून महिला कलाकारांच्या कलाविष्काराचे कौतुक केले.
मंगळवारी (दि. २८) आयोजित दुपारच्या सत्रात विविध महिला बचत गट आणि सांस्कृतिक पथकांनी पारंपरिक मंगळागौरीचे आकर्षक सादरीकरण करत महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन घडवले. पारंपरिक खेळ, गीते आणि नृत्याच्या माध्यमातून महिलांनी सांस्कृतिक वारसा जपतानाच सामाजिक प्रबोधनाचा प्रभावी संदेशही दिला.
यावेळी महिला गटांनी महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी, कुटुंबव्यवस्था, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक ऐक्य यांसारख्या विविध विषयांवर आधारित मंगळागौरीचे सादरीकरण करून उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवली. परंपरा आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.
याप्रसंगी अनूप मोरे यांनी सहभागी महिला कलाकारांचे आणि आयोजकांचे अभिनंदन केले. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्याबरोबरच समाजात सकारात्मक संदेश पोहोचतो. आपल्या परंपरा, संस्कृती आणि सामाजिक मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी अशा कार्यक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला, नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. सहभागी महिला गटांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर उत्साह, संस्कृती आणि नारीशक्तीच्या जल्लोषाने भारावून गेला.


















