- पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३१ जुलै २०२६) :- साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी निगडी येथील भक्ती-शक्ती शिल्पासमोर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने तात्पुरते वाहतूक बदल लागू केले आहेत.
पोलीस उपायुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत जुना मुंबई-पुणे महामार्गावरील पुणागेट हॉटेलसमोरील मर्ज-आऊट येथून भक्ती-शक्ती चौकाकडे सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना मात्र या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.
वाहनचालकांनी सेंट्रल चौक – भक्ती-शक्ती उड्डाणपूल – रुद्रा पार्किंग मार्गे आपल्या इच्छित स्थळी जावे, असे पर्यायी मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे.
वाहतूक शाखेने नागरिकांना सहकार्य करण्याचे तसेच दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आवाहन केले आहे.


















