- स्वीकृत नगरसदस्यांच्या नियुक्तीवरून महापालिकेत राजकीय तणाव..
- आजच्या सभेतही नियुक्तीचा विषय निकाली निघतो की पुन्हा तहकूब होतो?..
- शहरवासीयांची उत्सुकता पोहोचली शिगेला…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ४ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसदस्यांच्या नियुक्तीचा मुद्दा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ”नारीशक्तीला आम्ही वंदन करतो पण एका नारीला स्वीकृत नगरसेवक देण्यास सत्ताधारी घाबरतात?” अशी आगपाखड विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी सत्ताधाऱ्यांवर करत सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. ५) होणाऱ्या सर्वसाधारण सभेतही या नियुक्तीचा विषय निकाली निघतो की पुन्हा तहकूब होतो?. याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान महाराष्ट्र महानगरपालिका नियम २०१२ नुसार महापालिकेत १० नामनिर्देशित सदस्य नियुक्त करण्याचा प्रस्ताव सभेपुढे ठेवण्यात आला आहे. यामध्ये भाजप व अपक्ष आघाडीला ७ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ३ सदस्य देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
तथापि, या प्रक्रियेला अपेक्षित गती मिळत नाही. तब्बल १० स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव गेल्या अनेक सभांपासून वारंवार तहकूब ठेवण्यात येत असल्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. त्यामुळे प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राष्ट्रवादीकडून अंतिम नावे जाहीर…
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी माजी नगरसेवक फझल शेख, राजेंद्र जगताप आणि माजी नगरसेविका सीमा सावळे यांची नावे पुढे केली आहेत. याउलट, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून अद्याप अधिकृत नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. यामुळे नियुक्ती प्रक्रियेत जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
महिला माजी नगरसेविकेच्या नावाला विरोध?…
विशेष म्हणजे, राष्ट्रवादीकडून स्वीकृतसाठी महिला उमेदवाराचे नाव पुढे आल्याने सत्ताधारी पक्षात अंतर्गत मतभेद वाढल्याची चर्चा रंगली आहे. याच अंतर्गत विरोधामुळेच भाजपकडून स्वीकृत नगरसदस्यांची नावे जाहीर केली जात नसल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. दरम्यान, सातत्याने तहकूब होत असलेल्या या निर्णयामुळे महापालिकेतील कारभारावर परिणाम होत असून, नागरिकांच्या अपेक्षांनाही तडा जात असल्याची टीका होत आहे. मंगळवारच्या सभेत हा प्रश्न निकाली निघणार की पुन्हा एकदा राजकीय कोंडी कायम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












