न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) आणि इतर रुग्णालयात उपचार घेताना मृत झाल्यास थकीत संपूर्ण बिल माफ केले जाणार आहे. स्थायी समितीने बुधवारी (दि. १२) रोजी ऐनवेळी या निर्णयाला मंजुरी दिली आहे.
सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. वायसीएम रुग्णालयात शहर व राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी येतात. त्यातील बहुतांश रुग्णांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. वायसीएममध्ये उपचारासाठी सामान्य दर आकारले जात असले तरी, खूपदा उपचाराचे बिल रुग्णाचे आर्थिक कुवतीपेक्षा अधिक असते. पालिकेच्या वाससीएम व इतर रुग्णालयात उपचाराकरिता दाखल झालेल्या रुग्णाचा उपचार चालू असताना किंवा रुग्णालयात दाखल असताना मृत्यू झाल्यास रुग्णाच्या उपचारांवरील खर्चाचे सर्व बिल माफ करण्यात येणार आहे.
बहुतांश रुग्णांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. तसेच मानवतेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे मडिगेरी यांनी सांगितले.














