न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०१९) :- शहरात निर्माण होणा-या राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने स्वतंत्र धोरण निश्चित केले आहे. या राडारोड्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. या धोरणास स्थायी समितीने चर्चेविना मंजुरी देऊन पालिका सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली आहे.
दिल्ली व अहमदबाद येथे राड्यारोड्यापासून पुनर्वापर प्रकल्प राबविला जात आहे. त्या धर्तीवर पालिकेने हे धोरण तयार केले आहे. पाचशे किलोपेक्षा जास्त राडारोडा पालिकेच्या कंटेनरने मोशी कचरा डेपोत वाहून नेला जाणार आहे. प्रति किमीप्रति टनासाठी १५ रुपये आणि प्रक्रिया शुल्कासाठी प्रतिटन २५० रुपये आकारण्यात येतील.
नदी, नाले, तळे, मोकळ्या जागा किंवा पदपथावर कोठेही राडारोडा टाकल्यास शुल्काच्या दहापट दंड व फौजदारी कारवाई केली जाईल. राडारोड्यापासून पेव्हींग ब्लॉक, कर्ब स्टोन, चेंबर कव्हर, ट्री गार्ड, युटीलिटी डक्ट तयार केले जाणार आहे. पुनर्वापर साहित्याचा वापर केल्यास बांधकाम व्यावसायिक, नागरिक व पालिका ठेकेदारांला सदरचे साहित्य बाजारभावापेक्षा २० टक्के कमी दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, सामान्यकरात सवलत दिली जाणार आहे. या धोरणास समितीने बुधवारी (दि. १२) रोजी मंजुरी दिली.

















