- ४ हजार ३३६ चौरस फूट अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त..
- १२०० पोलीस, २१८ एमएसएफ जवानांचा बंदोबस्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मौजे चिखली, कुदळवाडी आणि जाधववाडी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर सोमवारी पहाटे मोठी निष्कासन कारवाई करण्यात आली. अंधारात सुरू झालेल्या या धडक मोहिमेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या कारवाईत एकूण ४ हजार ३३६.२८ चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली.
महापालिकेने विसावा चौक ते पोलीस चौकी रस्त्यावरील गट क्रमांक ७०० मधील अनधिकृत पत्राशेड, जाधववाडी रस्त्यावरील वीट बांधकाम पत्राशेड, कुदळवाडी पोलीस चौकीजवळील गट क्रमांक ६७८ मधील अनधिकृत आरसीसी बांधकाम तसेच सावता माळी मंदिर रस्ता परिसरातील पत्राशेडवर कारवाई केली.
ही कारवाई महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईसाठी बांधकाम परवानगी विभागाचे १२ उपअभियंते, ४ कनिष्ठ अभियंते, २४ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीट निरीक्षक) तसेच धडक कारवाई पथकातील कर्मचारी सहभागी झाले होते.
कायदोव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाचे सुमारे १२०० अधिकारी व कर्मचारी आणि २१८ एमएसएफ जवान तैनात करण्यात आले होते. तसेच १० पोकलेन, १० जेसीबी, ५० मजूर, ३ अग्निशमन वाहने आणि २ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही कारवाईत सहकार्य केले.
“पिंपरी चिंचवड शहरामध्ये नागरिकांनी कोणत्याही प्रकारची अनधिकृत बांधकामे उभारू नयेत. नियमबाह्य बांधकामांविरोधात महानगरपालिका प्रशासनाची कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करून शहराच्या नियोजनबद्ध विकासाला सहकार्य करावे.”
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका…














