- बोपखेलमध्ये ४.४७ लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला; आरोपी फरार..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बोपखेल (दि. ११ मे २०२६) :- घराची चावी विश्वासाने जवळच्या व्यक्तीकडे सुपूर्द करणे बोपखेल येथील एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. फिर्यादी महिला कोल्हापूर येथे गेल्याची संधी साधून, आरोपीने घरातून सुमारे ४ लाख ४७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मनीषा दीपक हिरवळे (वय ३८, रा. बोपखेल) या काही कामासाठी कोल्हापूर येथे गेल्या होत्या. घरी असलेल्या मांजरींना वेळेवर जेवण मिळावे, या उद्देशाने त्यांनी विश्वासाने घराची चावी आरोपी अवतार सिंघविर सिंघ सोहल (मूळ रा. जालंधर, पंजाब) याच्याकडे सोपवली होती.
मात्र, फिर्यादी बाहेर गावी असताना ७ मे रोजी आरोपीने त्यांना फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. “तू काम सोडून बाहेर जातेस, आता तुला संपवतो आणि तुला माझ्या मागे पंजाबपर्यंत यायला लावतो,” अशी धमकी त्याने दिली.
फिर्यादी १० मे रोजी परतल्या असता, त्यांना घरातील कपाटाचे लॉक उघडलेले दिसले. आरोपीने त्याच्याकडे असलेल्या चावीचा वापर करून घरात प्रवेश केला आणि लाकडी कपाटातील ड्रॉवरमधून १४ तोळे ०९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरलेल्या दागिन्यांची एकूण बाजारपेठीय किंमत ४,४७,०००/- रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेप्रकरणी मनीषा हिरवळे यांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपी अवतार सिंघ सोहल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रहाणे करत असून, फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.













