न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. १२ मे २०२६) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) कार्यालयात मा. आयुक्त अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीत तालुक्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत सूर्यघर योजना, प्रस्तावित रिंगरोड, नगररचना योजना (TP स्कीम), पवना नदीवरील पूल, रखडलेले रस्ते तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीत केंद्र शासनाच्या सूर्यघर योजनेच्या अंमलबजावणीबाबत तसेच नागरिकांना या योजनेचा अधिकाधिक लाभ मिळावा यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यासोबतच प्रस्तावित रिंगरोड व TP स्कीम संदर्भात शेतकरी बांधवांकडून व्यक्त होत असलेल्या अडचणी, हरकती व मागण्यांवरही विचारविनिमय करण्यात आला. विकासाच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे तसेच त्यांच्या भावना विचारात घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी भूमिका आमदार सुनील शेळके यांनी प्रशासनासमोर मांडली. यावर सकारात्मक भूमिका घेत संबंधित प्रश्नांवर येत्या दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन PMRDA आयुक्त अभिजित चौधरी यांनी दिले.
सांगवडे ते मामुर्डी दरम्यान पवना नदीवरील पुलाच्या जोडरस्त्यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. यासाठी PMRDA व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त पाहणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच देहू ते येलवाडी रस्त्याचे रखडलेले काम त्वरित सुरू करण्यासाठी संबंधित अधिकारी व ठेकेदारांना निर्देश देण्यात आले असून पुढील सात दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
देहू शहरातील ड्रेनेज लाईनचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी DPR तयार करून आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. तालुक्यातील नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, विकासकामांना गती मिळावी तसेच रखडलेली कामे तातडीने पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या.
बैठकीस PMRDA च्या विविध विभागांचे अधिकारी, शेतकरी बांधव तसेच संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














