- चालकावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आळंदी (दि. १३ मे २०२६) :- आळंदी येथील पीएमटी बस स्टॉप परिसरात एका बस चालकाने निष्काळजीपणे बस चालवून एका ३५ ते ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, आळंदी पोलीस स्टेशनमध्ये बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार दि. ११ मे रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास आळंदी येथील पीएमटी बस स्टॉपवर हा अपघात झाला. आरोपी बस चालक हनुमान ज्ञानोबा जाधव (वय २७, रा. आळंदी, मूळ रा. परभणी) हा आपली बस पार्क करत असताना, त्याने परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे बस चालवली. यावेळी बसच्या डाव्या बाजूच्या मागील चाकाखाली एक अनोळखी इसम आल्याने त्याच्या डोक्यावरून चाक गेले आणि त्याचा मृत्यू झाला.
अपघातातील मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असून, त्याच्या अंगात जांभळ्या रंगाचा टी-शर्ट (ज्यावर पांढरे व निळे पट्टे आहेत) आणि निळ्या रंगाची ट्रॅक पँट आहे. अद्याप या व्यक्तीची ओळख पटलेली नाही.
याप्रकरणी पोलीस हवालदार राजेंद्र विक्रम कोल्हे यांनी फिर्याद दिली आहे. आळंदी पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काकडे करत आहे.














