- कंपनी सुपरवायझरला बेदम मारहाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
महाळुंगे (दि. १३ मे २०२६) :-महाळुंगे येथील सुजलॉन कंपनीच्या गेटवर एका अपघाताच्या कारणावरून झालेल्या वादात कंपनीच्या सुपरवायझरला चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हर्षल उल्हास शेप (वय ३६, रा. मोशी) यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इलॉन कंपनीसमोर एका महिलेचा अपघात झाला होता. फिर्यादी हर्षल शेप यांनी मानवतेच्या दृष्टीने जखमी महिलेला तिचा मुलगा सुमीत गुंजाळ (आरोपी) याच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, त्यानंतर सुमीत आणि त्याच्या तीन मित्रांनी फिर्यादीशी वाद घालण्यास सुरुवात केली.
आरोपींनी फिर्यादी हर्षल आणि त्यांचा भाऊ गोपाळ लहाने यांना शिवीगाळ करत अंगावर धावून गेले. जिवाच्या भीतीने फिर्यादी सुजलॉन कंपनीच्या आत पळाले असता, आरोपींनी कंपनीत शिरून त्यांना शर्ट धरून बाहेर ओढत आणले.
मारहाणीदरम्यान आरोपी सुमीत गुंजाळ याने रस्त्यावरील दगडाने हर्षल यांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर प्रहार केला. तसेच त्याच्यासोबत असलेल्या एका साथीदाराने लाकडी काठीने हर्षल यांच्या डाव्या पायावर मारून त्यांना गंभीर जखमी केले.
याप्रकरणी पोलिसांनी सुमीत गुंजाळ आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस हवालदार रेंगडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
















