न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १३ मे २०२६) :- चुकीच्या खात्यात गेलेले पैसे परत मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका महिलेची सायबर चोरट्यांनी तब्बल ६ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने आपल्या मित्राला ऑनलाईन बँकिंगद्वारे पैसे पाठवले होते. मात्र, नजरचुकीने हे पैसे दुसऱ्याच बँक खात्यात जमा झाले. आपले पैसे परत मिळवण्यासाठी त्यांनी बँकेच्या कस्टमर केअरचा नंबर शोधून त्यावर संपर्क साधला. यावेळी समोरून बोलणाऱ्या आरोपींनी आपण बँकेचे अधिकारी बोलत असल्याचा बनाव रचला.
आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडले. या कॉलच्या माध्यमातून आरोपींनी फिर्यादीचा मोबाईल हॅक केला. त्यानंतर बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवून त्यांच्या मोबाईलवर आलेले ओटीपी (OTP) देण्यास त्यांना भाग पाडले.
आरोपींनी फिर्यादीची आयसीआयसीआय (ICICI) आणि एचडीएफसी (HDFC) या दोन्ही बँकांमधील खाती हॅक केली. पैसे परत मिळतील असे आमिष दाखवून आरोपींनी त्यांच्या खात्यातून वेळोवेळी एकूण ६,८७,००० रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
नागरिकांना आवाहन:
कोणत्याही बँकेचा कस्टमर केअर अधिकारी कधीही व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल करत नाही किंवा ओटीपी मागत नाही. अनोळखी व्यक्तीला आपल्या बँक खात्याची माहिती देऊ नका. फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा नजीकच्या सायबर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा














