सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड ( दि. १६ मे २०२६ ) :- नो-पार्किंगमधून उचललेली दुचाकी दंड न भरता सोडण्यासाठी वाहतूक पोलिसाच्या खाजगी सहायक कंत्राटी कामगाराने चक्क स्वतःच्या स्कॅनरवर पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. १५) चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहाच्या समोर उघडकीस आला. या प्रकारामुळे वाहतूक पोलिसांच्या पारदर्शकतेवर आणि कंत्राटी कामगारांच्या अरेरावीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
रामकृष्ण मोरे सभागृह परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ होती. यादरम्यान वाहतूक पोलिसांनी नो-पार्किंगमध्ये पार्क केलेली एक दुचाकी टोईंग व्हॅनद्वारे उचलली. काही वेळातच संबंधित गाडीचा मालक त्या ठिकाणी पोहोचला. त्याने गाडी सोडण्याची विनंती केली असता, तिथे उपस्थित असलेल्या टोईंग व्हॅनवरील कंत्राटी कामगाराने शासकीय पावती फाडण्याऐवजी किंवा अधिकृत दंड न घेता, स्वतःचा वैयक्तिक ऑनलाईन स्कॅनर वाहनचालकासमोर धरला आणि पैसे वसूल केले.
हा सर्व बेकायदेशीर व्यवहार चालू असताना, तिथे उपस्थित असलेल्या न्यूज पीसीएमसी च्या प्रतिनिधीने या प्रकाराचा आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. आपण कॅमेऱ्यात कैद होत आहोत आणि आपली लाचखोरी उघडकीस येणार, हे लक्षात येताच कंत्राटी कामगाराचे धाबे दणाणले. कारवाईच्या भीतीने त्याने तात्काळ ‘यू-टर्न’ घेत अधिकृत पावती दिली.














