न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी (दि. १६ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड शरातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आलेल्या एका अट्टल गुंडाला निगडी पोलिसांनी धारदार कोयत्यासह अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १४ मे ) रात्री सव्वादहाच्या सुमारास आकुर्डी येथील क्रांतीनगरमधील विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आली.
गोपाळ अंकुश हळनोर (वय २५, रा.चिखली ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई प्रदिप चंद्रसिंग पावरा यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गोपाळ हळनोर याला पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०१, पिंपरी-चिंचवड यांच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण हद्दीतून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. त्यानुसार १५ जानेवारी २०२६ रोजी त्याला जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले होते.
तडीपारीचा आदेश लागू असतानाही, आरोपीने सक्षम प्राधिकाऱ्याची कोणतीही परवानगी न घेता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बेकायदेशीरपणे प्रवेश केला. एवढेच नव्हे तर, तो आकुर्डी येथील क्रांतीनगर भागात एक लोखंडी कोयता घेऊन फिरत असताना पोलीस पथकाला मिळून आला.
आरोपीने पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा शुक्रवार, दि. १५ मे रोजी पहाटे ०३:२५ वाजता निगडी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवादार डगळे करीत आहेत.













