न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दक्षिण म्हाळुंगे (दि. १८ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील वाहन चोरी, घरफोडी आणि इतर चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि दाखल गुन्ह्यांची जलद गतीने उकल करण्यासाठी पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांनी वेळोवेळी विशेष सूचना दिल्या होत्या. या सूचनांचे तंतोतंत पालन करत दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी घडलेल्या गुन्ह्यांचा छडा लावत तब्बल २३ गुन्हे उघडकीस आणले असून, एकूण ५२ लाख ९१ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत केला आहे.
शनिवारी, दिनांक १६ मे रोजी दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात आयोजित एका विशेष कार्यक्रमात पोलीस उपायुक्त परिमंडळ ४, श्रीमती श्वेता खेडकर यांच्या हस्ते हा मुद्देमाल फिर्यादी आणि मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आला.
दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने गुन्ह्यांची उकल केली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये चोरीला गेलेल्या मोटारसायकली, सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, टेम्पो, रोख रक्कम,(एकूण किंमत: ₹५२,९१,८८०/-) हा सर्व मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत केला.
आपला चोरीला गेलेला मौल्यवान मुद्देमाल आणि मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी अत्यंत समाधान व्यक्त केले आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.
पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी या धडक कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.














