- १५ लाख २८ हजारांचा ऐवज लंपास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. १८ मे २०२६) :- रावेत परिसरातील एका बंद घराचा कोयंडा तोडून अज्ञात चोरांनी तब्बल १५ लाख २८ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज अशोक भोंडवे (वय २५, रा. रावेत गावठाण ) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १५ मे २०२६ रोजी सकाळी १०:४५ ते दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घडली. फिर्यादी मनोज भोंडवे हे खासगी नोकरी करतात. घटनेच्या वेळी त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडला आणि आत प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील कपाटातून सोन्याचे १७८ ग्रॅम वजनाचे दागिने, चांदीचे ७५ ग्रॅम वजनाचे दागिने, रोख रक्कम १ लाख ४५ हजार रुपये इत्यादी एकूण किंमत: १५,२८,०००/- रुपयांचे दागिने लापस केले.
घरी परतल्यानंतर भोंडवे यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. १६ मे रोजी मध्यरात्री १:३९ वाजता याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खिळे करत आहेत.
भरदिवसा झालेल्या या मोठ्या घरफोडीमुळे रावेत परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.













