सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दिघी, (दि. १८ मे २०२६) :- चऱ्होली येथील तनिष पार्क सहकारी गृहरचना संस्थेमध्ये सुरू असलेल्या विशेष सभेदरम्यान जुन्या वादातून ज्येष्ठ नागरिकावर शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी गणेश बाबूराव साने याला दिघी पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत बाळासाहेब पोपटराव झोडगे (वय ५८) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मे रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तनिष पार्क सोसायटीच्या एच विंगमध्ये विशेष सभा सुरू होती. यावेळी सोसायटीमधील जुन्या तक्रारीच्या कारणावरून आरोपी गणेश साने हा अचानक लिफ्टमधून बाहेर आला. त्यानंतर त्याने फिर्यादी यांच्या पाठीमागून येत कुठल्यातरी धारदार शस्त्राने डोक्यावर आणि पाठीवर वार केले.
या हल्ल्यात बाळासाहेब झोडगे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. हल्ल्यानंतर आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर सोसायटी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दिघी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि शिंदे करत आहेत.













