न्युज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १८ मे २०२६) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मुळशी तालुक्यातील भूगाव येथे उभारण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंगवर धडक कारवाई करत ते जमीनदोस्त केले. या कारवाईमुळे परिसरातील अवैध होर्डिंगधारकांचे धाबे दणाणले आहेत.
मौजे भूगाव येथील गट क्रमांक ४४ मधील जागेत कोणतीही अधिकृत परवानगी न घेता हे होर्डिंग उभारण्यात आले होते. धोकादायक स्थितीतील या होर्डिंगवर पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने कारवाई केली. महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली.
सहआयुक्त (प्रभारी) हिंमत खराडे यांनी सर्व होर्डिंगधारकांना नियमांनुसार परवानगी घेण्याचे आवाहन करत अन्यथा कठोर कारवाईचा इशारा दिला. पीएमआरडीएने पुढील काळातही अशी मोहीम अधिक तीव्र करण्याचे स्पष्ट केले आहे.














