- नैराश्यातून समाधान हेल्पलाईनवर कॉल केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, दि. २० मे २०२६ : पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांना मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला भोसरी पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. पोलिस तपासात संबंधित व्यक्तीने नैराश्यातून ही कृती केल्याचे समोर आले आहे.
आशिष जमदाडे पाटील (रा. चिखली) असे धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तो भोसरी एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास त्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या ‘समाधान’ हेल्पलाईनवर फोन करून महापौरांना मारण्याची धमकी दिली होती.
यानंतर पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांकाचे लोकेशन तपासत चिखली परिसरातून त्याला शोधून काढले. भोसरी पोलीस ठाण्यात चौकशीदरम्यान त्याने मानसिक नैराश्यातून फोन केल्याची कबुली दिली. पोलिसांनी नातेवाईक व स्थानिकांकडूनही माहिती घेतली असता त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याला समज देऊन घरी सोडले.













