- महापालिकेच्या कामकाजाला लागणार महिनाभर ब्रेक..
- महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी झाकले दालनातील फलक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, दि. २० मे २०२६ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून प्रशासनाने तातडीने अंमलबजावणी सुरू केली आहे. आजची स्थायी समितीची सभाही तहकूब करण्यात आली आहे.
आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर महापौर, सत्तारूढ पक्षनेते, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी आपल्या दालनातील नावाचे फलक झाकले आहेत. तसेच वाहनांवरील नावाच्या पाट्यादेखील झाकण्यात आल्याचे चित्र महापालिका भवनात पाहायला मिळाले.
निवडणूक आयोगाने संबंधित प्रशासनाला आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सर्वसाधारण सभा, स्थायी समितीच्या बैठकीत कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतले जाणार नाहीत. परिणामी पुढील महिनाभर महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर मर्यादा येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, २५ जूनपूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.













