- महापौर रवि लांडगे यांचा निर्धार…
- नऊ महिन्यांत प्रकल्प मार्गी लावून शहरवासियांना देणार दिलासा..
- त्या दोन ठेकेदारांना कामांचे दिले आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २० मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प आता वेगाने मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या प्रकल्पातील रखडलेली महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी महापालिकेने दोन मोठ्या निविदांना मंजुरी देत संबंधित ठेकेदारांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. त्यामुळे शहराच्या वाढत्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे.
महापौर रवी लांडगे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पाचे उर्वरित काम पुढील नऊ महिन्यांत पूर्ण करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रितपणे काम करणार आहेत. शहरातील सर्व आमदार आणि लोकप्रतिनिधींची लवकरच संयुक्त बैठक आयोजित करून प्रकल्पातील अडचणी दूर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“या प्रकल्पात कोणतेही राजकारण होऊ देणार नाही. शहरवासीयांच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही,” असेही महापौरांनी ठामपणे सांगितले.
भामा आसखेड धरणापासून नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टाकीपर्यंत १७०० मिलिमीटर व्यासाची भूमिगत जलवाहिनी टाकण्याच्या उर्वरित कामासाठी ३३ कोटी ३५ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली होती. त्यामध्ये पात्र ठरलेल्या निविदांपैकी एस.एस. साठे या ठेकेदाराची ०.१ टक्के कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली आहे. हे काम ३३ कोटी ३५ लाख ५४ हजार ८७७ रुपयांत पूर्ण केले जाणार असून त्यासाठी नऊ महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली आहे.
तसेच ब्रेक प्रेशर टाकीपासून तळवडे आणि देहूपर्यंत १४०० मिलिमीटर जलवाहिनीचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी ५० कोटी ६९ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली होती. त्यामध्ये जावळे कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराची ५२ कोटी २३ लाख ५१ हजार १३३ रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहे. या कामासाठी दहा महिन्यांची मुदत देण्यात आली असून संबंधित ठेकेदारांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.
या दोन्ही कामांना गती मिळाल्याने आगामी काळात पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.














