न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २२ मे २०२६) :-एमआयडीसी भोसरी येथील स्पाईन रोडवर काल रात्री एक भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एका ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. उत्तम रणपिसे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २० मे रोजी रात्री ९:०० वाजेच्या सुमारास स्पाईन रोडवरील कलावंतीन महालमाता सर्व्हिसिंग सेंटरसमोर हा अपघात झाला. आरोपी ट्रक चालक किशोर हरीचंद्र जाधव (वय ५०, रा. चाकण ) हा आपल्या ताब्यातील टाटा कंपनीचा ट्रक घेऊन जात असताना, त्याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन निष्काळजीपणे चालवले. या ट्रकने उत्तम रणपिसे यांच्या स्कूटीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. धडक बसल्याने रणपिसे हे रस्त्यावर कोसळले आणि ट्रकचे डाव्या बाजूचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकरणी मृत उत्तम यांचे भाऊ प्रशांत उत्तम रणपिसे (वय ३५, रा. चिखली ) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मणेर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत













