- आ. शंकर जगताप यांच्या पत्राची महापालिका प्रशासनाकडून तात्काळ दखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ मे २०२६) :- पिंपळे निलख येथील रक्षक चौकातील बहुप्रतीक्षित उड्डाणपूल अखेर सर्वसामान्य नागरिक आणि वाहनचालकांसाठी खुला करण्यात आला आहे. चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने तातडीने निर्णय घेत हा पूल वाहतुकीसाठी सुरू केला.
उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊनही तो वाहतुकीसाठी बंद असल्याने रक्षक चौक परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना तासनतास वाहतुकीत अडकून पडावे लागत होते. याबाबत आमदार जगताप यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देत सुरक्षा ऑडिट आणि तांत्रिक तपासणी तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली होती.
महापालिकेच्या सहशहर अभियंता संध्या वाघ यांनी सांगितले की, पावसाळा आणि सर्व्हिस रोड दुरुस्तीमुळे वाहतुकीवर ताण वाढत होता. आमदारांच्या पत्राची दखल घेत प्रशासनाने सर्व प्रक्रिया पूर्ण करून पूल खुला केला. त्यामुळे आता औंध ते सांगवी फाटा आणि रावेत ते किवळे हा प्रवास अधिक वेगवान आणि सिग्नलमुक्त झाला आहे.














