न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २३ मे २०२६) :- भोसरी औद्योगिक क्षेत्रात महानगरपालिकेकडून उभारण्यात येत असलेल्या पर्यावरण उद्यानाच्या दुरवस्थेबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारासह आजूबाजूचा परिसर सध्या राडारोडा, माती आणि कचऱ्याने व्यापलेला असून, हे पर्यावरण उद्यान आहे की उकिरडा, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून या परिसराच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. उद्यानाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून संथगतीने सुरू असून, ठिकठिकाणी पडलेल्या बांधकाम साहित्य आणि राडारोड्यामुळे संपूर्ण परिसराला बकाल स्वरूप आले आहे.
विशेष म्हणजे पावसाळा तोंडावर असताना अद्यापही मूलभूत कामे रखडलेली आहेत. पाऊस सुरू झाल्यानंतर येथे चिखल, पाणी साचणे आणि वाहतुकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून प्रलंबित स्थापत्य विषयक कामे मार्गी लावावीत, तसेच संबंधित ठेकेदाराला योग्य सूचना द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.














