न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. २२ मे २०२६) :- मानवतेला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि क्रूर घटना रावेत परिसरात उघडकीस आली आहे. एका ३५ वर्षीय नराधमाने रस्त्यावरील एका मुक्या स्त्री जातीच्या कुत्रीवर बळजबरीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला असून, याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र रघुनाथ शाहू (वय ३५, सध्या रा. डेस्टिनेशन कॅफेसमोरील फूटपाथ, रावेत; मूळ, ओडिशा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रबंधात वकील प्रथमेश चंद्रकांत कांबळे (वय २६, रा. वाल्हेकरवाडी,) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १९ मे २०२६ रोजी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास रावेत येथील डेस्टिनेशन कॅफे, बालाजी हॉटेलजवळ आरोपी राजेंद्र शाहू हा अर्धनग्न अवस्थेत संशयास्पद रित्या फिरत होता. तिथे तो अश्लील व विकृत हालचाली करत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला. त्यानंतर अंदाजे १०:३४ वाजता त्याने तिथल्या एका मुक्या कुत्रीला पकडून तिच्यावर जबरदस्तीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला.
हा प्रकार डेस्टिनेशन कॅफेचे चालक स्वप्नील नितीन शहाडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर, त्यांनी वकील प्रथमेश कांबळे यांना याची माहिती दिली. कांबळे यांनी त्यांचे सहकारी संकेत करणकोट आणि सुफिया पाटील यांच्यासह घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता हा अमानुष प्रकार खरा असल्याचे समोर आले.
अत्याचारामुळे त्या पांढऱ्या रंगाच्या मुक्या कुत्रीच्या गुप्तांगाला गंभीर सूज आली असून तिला इन्फेक्शन झाले आहे. तिला हालचाल करताना प्रचंड त्रास होत असून तिची प्रकृती गंभीर आहे. प्राणीमित्रांनी तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
या अत्यंत क्रूर आणि विकृत कृत्याबद्दल आरोपी राजेंद्र शाहू याच्याविरुद्ध रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार आदमाने करत आहेत.
या घटनेमुळे रावेत व पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांमधून आणि प्राणीमित्रांकडून तीव्र संताप व्यक्त होत असून, अशा विकृत मानसिकतेच्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.













