- माहिती संकलन अचूक व वेळेत पूर्ण करण्यावर आयुक्तांचा भर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ मे २०२६) :- जनगणना २०२७ अंतर्गत सुरू असलेल्या गृहसूची व गृहनिर्माण जनगणना प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. कामात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा, असे निर्देश आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जनगणना प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले. माहिती संकलन करताना प्रत्येक नोंद अचूक राहील यासाठी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.
उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी नागरिकांनी प्रशासनाला योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, तसेच प्रगणक व पर्यवेक्षकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले.














