न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ मे २०२६) :- एफस्टिन फाईलसारख्या विकृत प्रकरणात पंतप्रधानांचे नाव येत असतानाही देशातील जनता शांत आहे, हा आपल्या सहनशीलतेचा परमोच्च बिंदू असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. आता सत्याग्रह आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी येथे फुले, गांधी, नेहरू, आंबेडकर विचारमंचच्या वतीने आयोजित “महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद” या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
सपकाळ म्हणाले, सध्या “राष्ट्र” ही संकल्पना जात आणि धर्मापुरती मर्यादित होत चालली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर २०० रुपये झाले तरी चालतील, पण मोदी आणि भाजपच पाहिजे, अशी मानसिकता समाजात वाढत असल्याची टीकाही त्यांनी केली. “कॉक्रोच पार्टी” निर्माण होणे हे पुरोगामी आणि तरुण विचारांच्या संघटनांचे अपयश असल्याचे सांगत त्यांनी समाजातील निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त केली.
लोक कार्यकर्ते किंवा नागरिक म्हणून नव्हे, तर केवळ निरीक्षक, समीक्षक आणि उपदेशकाच्या भूमिकेत राहू लागले आहेत. प्रत्येकामध्ये “मी”पणा वाढल्याने एकवाक्यता उरलेली नाही. फुले, गांधी आणि नेहरू यांनी मांडलेल्या राष्ट्रवादासाठी पुन्हा सत्याग्रहाची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले.













