- पदपथ मोकळे करण्यासाठी महापालिकेची विशेष मोहीम; हॉकर्स झोन उभारण्याचे निर्देश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली असून दुकानांसमोरील अनधिकृत अतिक्रमण १५ दिवसांत हटवावे, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात क्षेत्रीय कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेताना ते बोलत होते.
आयुक्तांनी सांगितले की, पदपथ हे नागरिकांसाठी असून त्यावर अतिक्रमण झाल्याने वाहतूक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. काही दुकानदार दुकानाबाहेर साहित्य ठेवून रस्ता अडवतात. अशा सर्वांनी तत्काळ अतिक्रमण हटवावे. अन्यथा महापालिकेकडून अतिक्रमण निष्कासनासह दंडात्मक कारवाई केली जाईल.
शहरात बकालपणा वाढू नये आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत हॉकर्स झोन तयार करण्याचे तसेच विशेष पथक नेमून सातत्याने देखरेख ठेवण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.














