- खा. बारणे यांच भाकीत ठरलं खरं; कारवाई कोणावर?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ मे २०२६) :- औंध-रावेत बीआरटी रोडवरील रक्षक चौकातील नव्याने सुरू झालेल्या उड्डाणपुलावर उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी अपघात झाल्याने पुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तीव्र उतारामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून मोटार पलटी झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेनंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. पुलाच्या पाहणीदरम्यान त्यांनी तीव्र उतारामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते. पुण्यातील नवले पुलासारखी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी प्रशासनाने तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी बारणे यांनी केली. नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.














