- फसलेलं ‘पे अँड पार्क’ धोरण नव्याने राबविण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा एकदा ‘पे अँड पार्क’ पॉलिसी लागू करण्याच्या हालचालींना वेग आला असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याची चर्चा शहरभर सुरू झाली आहे. यापूर्वी मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेली पार्किंग पॉलिसी तांत्रिक अडचणी आणि नियोजनाच्या अभावामुळे बंद पडली होती. आता त्याच धोरणाला नव्या नावाने पुन्हा पुढे आणले जात असल्याने नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
महापालिकेच्या स्थायी समिती आणि शहरी दळणवळण विभागाच्या बैठकीत शहरात शुल्क आकारून पार्किंग व्यवस्था सुरू करण्याचे संकेत देण्यात आले. गर्दीच्या भागात ‘पे अँड पार्क’, उड्डाणपुलाखाली नो पार्किंग झोन, स्मार्ट पार्किंग, कलर कोड आणि सॅटेलाईट सर्वेक्षण अशा संकल्पना मांडण्यात आल्या. मात्र, शहरातील अरूंद रस्त्यांची अवस्था, अपुरी पार्किंग जागा आणि वाढती वाहतूक कोंडी यावर ठोस उपाय न करता थेट नागरिकांकडून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न सुरू होणार असल्याने धोरण राबविण्याआधीच त्यावर नागरिकांकडून टीका होत आहे.
विशेष म्हणजे, अनेक भागांत आजही अनधिकृत पार्किंग, फेरीवाले आणि अतिक्रमणामुळे तसेच अर्बन स्ट्रीटमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. त्यावर कारवाई करण्यात प्रशासन अपयशी ठरत असताना पार्किंग शुल्काच्या नावाखाली वाहनधारकांवर शुल्क लादणे कितपत योग्य ठरेल, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मोबाईल अॅपद्वारे स्मार्ट पार्किंग सुविधा देण्याचा दावा केला जात असला, तरी शहरातील अनेक भागांत मूलभूत वाहतूक व्यवस्थाच कोलमडलेली आहे. तसेच, पार्किंगसाठी घराजवळ परमिट देण्याची संकल्पना भविष्यात नवीन वाद निर्माण करू शकते, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पहिल्या टप्प्यात प्रमुख रस्त्यांवर ही योजना लागू केली जाणार असून, त्यानंतर संपूर्ण शहरात विस्तार केला जाईल, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र, नागरिकांच्या सोयीपेक्षा महसूल वाढविण्यावरच महापालिकेचा भर असल्याचा मतप्रवाह आता वाहनधारकांमध्ये तीव्र होताना दिसत आहे.














