- २५ दिवसांत जवळपास ७ हजार ८९४ नागरिकांनी घेतला लाभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘स्वागतम ई-प्रवेश’ या ऑनलाइन प्रवेश प्रणालीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. १ मे ते २५ मे २०२६ या कालावधीत सुमारे ७ हजार ८९४ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत प्रवेश अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन नोंदणी करून क्यूआर कोडद्वारे प्रवेश मिळत आहे. नोंदणीसाठी आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, डिजिटल प्रशासनाच्या दिशेने महापालिका सातत्याने वाटचाल करत असून या प्रणालीमुळे नागरिकांचा वेळ वाचत आहे. अधिकाधिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.














