न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ मे. २०२६) :- सांगवी फाटा ते किवळे रस्त्यावरील रक्षक चौक येथे उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून सध्या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी सुरक्षा तपासणी पूर्ण करण्यात आली असून सर्व सुरक्षा निकषांची पूर्तता करण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
भुयारी मार्ग आणि रॅम्पच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वाहनांना एकमेकांना ओलांडण्यास बंदी घालण्यात आली असून ताशी ३० किलोमीटर वेगमर्यादेचे फलक बसविण्यात आले आहेत. तसेच उताराच्या रस्त्यांवर वेग नियंत्रणासाठी आडवे पट्टे, सौरऊर्जेवरील इशारा दिवे आणि रात्री दृश्यमानता वाढविण्यासाठी परावर्तित पट्ट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी नागरिकांनी वाहतुकीचे नियम आणि वेगमर्यादेचे पालन करावे, असे आवाहन केले. तसेच अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी बीआरटीएस मार्गिकेत खासगी वाहनांनी प्रवेश करू नये, असे स्पष्ट केले.














