न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी(दि. २७ मे २०२६) :- पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार (हद्दपार) करण्यात आलेला एक सराईत गुन्हेगार आदेशाचा भंग करून पिंपरी भागात घातक शस्त्रासह फिरत असताना पिंपरी पोलिसांनी त्याला रंगेहात अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ४०० रुपये किमतीचा धारदार लोखंडी कोयता जप्त केला आहे.
दिनेश गोरख माने (वय ३१ वर्षे, रा. साईबाबा मंदिर शेजारी, विटकर चाळ, नेहरुनगर, पिंपरी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई भागवत गायकवाड (ब.नं. २५३३, संत तुकारामनगर पोलीस चौकी) यांनी पिंपरी पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मे रोजी सायंकाळी ७:५० वाजेच्या सुमारास पिंपरी येथील हिंदुस्तान अँटीबायोटिक्स कंपनीच्या मोकळ्या मैदानामध्ये एक इसम संशयास्पदरीत्या थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दिनेश माने याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ४०० रुपये किमतीचा एक धारदार लोखंडी कोयता मिळून आला. तो कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी थांबला असल्याचे तपासात समोर आले आहे.
आरोपी दिनेश माने याला मा. पोलीस उपआयुक्त (परिमंडळ १, पिंपरी चिंचवड) यांनी ११ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या आदेशान्वये (आदेश क्र. ७३/२०२४) पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून २ वर्षांसाठी (२४ महिने) तडीपार केले होते. हा तडीपारीचा काळ संपण्यापूर्वीच त्याने महाराष्ट्र शासन किंवा संबंधित पोलीस उपआयुक्तांची कोणतीही कायदेशीर लेखी परवानगी न घेता शहराच्या हद्दीत बेकायदेशीरपणे प्रवेश केला.
सध्या पिंपरी चिंचवड पोलीस हद्दीत मा. पोलीस सह आयुक्तांच्या आदेशानुसार १३ मे २०२६ ते २६ मे २०२६ या कालावधीत घातक शस्त्रे जवळ बाळगण्यास मनाई (शस्त्रबंदी) आदेश लागू करण्यात आलेला आहे. आरोपीने या आदेशाचेही उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी आरोपी दिनेश माने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार आसवले करत आहेत.














