- गुन्हे शाखा युनिट-१ ची कारवाई
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. २७ मे २०२६) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या एका अट्टल गुन्हेगाराला निगडी पोलिसांनी बेकायदेशीररित्या धारदार कोयता बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. ही कारवाई २४ मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास निगडी येथील ओटास्किम परिसरातील संग्रामनगर झोपडपट्टीत करण्यात आली. आयुब चमन खान (वय २८, रा. ओटास्किम, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आयुब खान याला पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ १, पिंपरी-चिंचवड) यांच्या आदेशानुसार दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तसेच पिंपरी-चिंचवडचे मा. पोलीस सह-आयुक्त यांच्या विशेष शाखेच्या आदेशान्वये शहरात १३ मे ते २६ मे २०२६ या कालावधीत शस्त्रबंदी व मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.
असे असतानाही, आरोपी आयुब खान हा तडीपारीच्या आणि मनाई आदेशाचे उल्लंघन करून निगडी परिसरात फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट ०१ च्या पथकाने संग्रामनगर झोपडपट्टी, अंकुश चौकाजवळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ३०० रुपये किमतीचा एक धारदार लोखंडी कोयता विनापरवाना व बेकायदेशीररित्या मिळून आला. पोलिसांनी तो कोयता जप्त केला असून याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट ०१ चे पोलीस हवालदार जयवंत जगन्नाथ राऊत यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सानप करीत आहेत.














