- काळेवाडीत चौघांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. २७ मे २०२६) :- काळेवाडी परिसरातील एका किरकोळ वादातून एका २५ वर्षीय तरुणावर धारदार हत्याराने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काळेवाडी येथील घनकचरा स्थलांतर केंद्रासमोर किरकोळ वादातून एका २५ वर्षीय तरुणावर धारदार हत्याराने वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. २३ मे) रात्री पावणे दहाच्या सुमारास एम. एम. चौक येथे घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी फिर्यादी सचिन संपत शिंदे (वय २५, रा. आनंद नगर, चिंचवड, पुणे) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अजित राजू चौगुले (वय २५, रा. चिंचवड), अनिकेत राजेंद्र तुपे (वय १९, रा.थेरगाव ), सचिन बाबासाहेब चौधरी (वय २६, रा.थेरगाव), वसिम बाबर खान (वय २८, रा. थेरगाव) या चार आरोपींना तात्काळ अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन शिंदे यांचे मेहुणे विशाल गणपत भोसले (वय २५) हे एम. एम. चौक परिसरातील घनकचरा स्थलांतर केंद्रासमोर थांबले होते. तिथे उपस्थित असलेल्या आरोपींशी त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यवसान भांडणात होऊन आरोपी क्र. १ ते ४ यांनी विशाल भोसले यांना आधी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी सोबत आणलेल्या धारदार हत्याराने विशाल यांच्या पाठीवर तीन ठिकाणी गंभीर वार केले. या भीषण हल्ल्यात विशाल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटना घडल्यानंतर फिर्यादी यांनी रविवारी (दि. २४ मे) सकाळी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. काळेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्परता दाखवत चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) गुरव करत आहेत.














