न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २७ मे २०२६) :- एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोशी टोलनाक्याजवळील ‘हॉटेल युवराज गार्डन’ येथे झालेल्या अनिल मारुती गोळे (ऊर्फ मोरे) यांच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत छडा लावला आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी ४ आरोपींना बेड्या ठोकल्या असून, न्यायालयीन कोठडीदरम्यान त्यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे.
दिनांक १३ मे रोजी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास अज्ञात इसमांनी हॉटेल युवराज गार्डनमध्ये अनिल मारुती गोळे यांच्यावर चाकूने सपासप वार करून त्यांचा निर्घृण खून केला होता. याप्रकरणी नागनाथ कुंडलिक चाटे (रा. कुरळी, खेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एम.आय.डी.सी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवली आणि १५ मे रोजी नागेश लक्ष्मण काळे (वय २९ वर्षे, रा. भोसरी), अजय सर्जेराव गायकवाड (वय २० वर्षे, रा. भोसरी), अजय सिकंदर आव्हाड (वय २७ वर्षे, रा. भोसरी), दत्ता चत्रभुज शिनगारे (वय ३० वर्षे, रा. लांडेवाडी, भोसरी) या चार आरोपींना अटक केली आहे.
अटक केलेल्या आरोपींना माननीय न्यायालयाने २५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या गुन्ह्यातील आणखी एक मुख्य फरार आरोपी नितीन दिगंबर धोत्रे (रा. भोसरी) याच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी तपास पथके रवाना करण्यात आली आहेत.
या गुन्ह्याचा पुढील तपास एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार करत आहेत.















