न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ मे २०२६) :- चिंचवड गावठाण ते थेरगावला जोडणाऱ्या बटरफ्लाय पुलाच्या पदपथावर गेल्या तीन आठवड्यांपासून करण्यात आलेली खोदाई अद्यापही तशीच खुली असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पुलावरील हे काम नेमके कोणत्या कारणासाठी सुरू करण्यात आले आणि ते इतके दिवस का रखडले आहे, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दररोज सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या संख्येने नागरिक या पुलावर फिरण्यासाठी, व्यायामासाठी तसेच सायकलिंगसाठी येत असतात. मात्र पदपथावर करण्यात आलेल्या मोठ्या खोदाईमुळे नागरिकांना चालताना अडथळे निर्माण होत असून अपघाताची शक्यता वाढली आहे.
विशेष म्हणजे खोदाईचा भाग खोल असल्याने येथून नदीचे पात्र स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे लहान मुले कुतूहलापोटी त्या ठिकाणी थांबून खाली डोकावून पाहत असल्याने पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच रात्रीच्या वेळी पुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही असुरक्षित वाटत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाने या ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात, संरक्षक बॅरिकेड्स उभारावेत तसेच रखडलेले काम त्वरित पूर्ण करावे.
– प्रदीप गायकवाड, शहराध्यक्ष, अर्बन सेल राष्ट्रवादी…















