-
- दापोडी-फुगेवाडीत विषारी दारूचा कहर..
- एकूण १५ जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ मे २०२६) :- पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात विषारी हातभट्टी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या मालिकेने खळबळ उडाली आहे. अवैधरीत्या विकल्या जाणाऱ्या स्पिरिटमिश्रित दारूचे सेवन केल्यानंतर अनेक नागरिकांना गंभीर विषबाधा झाली असून आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात सुरुवातीला काही जणांना अचानक चक्कर येणे, उलट्या होणे, तोंडाला फेस येणे अशी लक्षणे दिसू लागली. काहींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच अनेकांनी प्राण गमावले. काही नागरिकांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे समजते.
या प्रकरणाची व्याप्ती केवळ पिंपरी-चिंचवडपुरती मर्यादित नसून पुण्यातील हडपसर आणि काळेपडळ भागातही अशाच प्रकारच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांतच अनेक जणांचा बळी गेल्याने प्रशासन आणि पोलिस यंत्रणा हादरली आहे.
या प्रकरणामागे सराईत अवैध दारू विक्रेता योगेश वानखेडे याचे नाव समोर आले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासातून पुढे येत आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू असून या रॅकेटमागे आणखी मोठे जाळे कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मृतांमध्ये विजय राठोड, राजेंद्र राठोड, राजेंद्र राजपूत, अकबर पठाण, काशिनाथ निकाळजे, आनंद देसाई, अक्षय अवसरमल, सौरभप्पा भंगारी आणि भीमाप्पा बसवंत पुजारी यांच्यासह अन्य नागरिकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. दोन सख्ख्या भावांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
खासदार, आमदारांसह नगरसेवकांची कारवाईची मागणी…
स्थानिक नागरिकांनी परिसरात हातभट्टीची दारू खुलेआम विकली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी केला आहे. या पार्श्वभूमीवर खा. श्रीरंग बारणे, आ. शंकर जगताप, आ. अमित गोरखे, आ. बनसोडे, मा. आ. विलास लांडे, नगरसेवक योगेश बहल यांनी संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. अवैध दारू विक्रीला संरक्षण देणाऱ्यांवरही कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, पोलिसांनी मृत्यूंच्या कारणांबाबत सावध भूमिका घेतली आहे. काही मृत्यू अन्य कारणांमुळे झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत असला तरी मृत्यूपूर्वी बहुतांश नागरिकांमध्ये विषबाधेची तीव्र लक्षणे दिसून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अधिकृत वैद्यकीय अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेनंतर दापोडी, फुगेवाडी आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अवैध दारू विक्रीच्या अड्ड्यांवर तातडीने कारवाई करावी, दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.















