- दापोडी पोलिसांनी ठोकल्या चार जणांना बेड्या…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२९ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुगेवाडी परिसरात विषारी हातभट्टी दारू सेवनामुळे नऊ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून संपूर्ण शहर हादरले आहे. दिनांक २६ मे ते २८ मे २०२६ या कालावधीत ही घटना घडली असून याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११४/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०५, १२३, ११०, १२५, २७५, ३(५) तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलम ६५ (ई), ६८, ८१ आणि ८३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात विषारी गावठी हातभट्टी दारू सेवनामुळे पांडुरंग सखाराम फुगे (वय ५३), अकबर अजिमखान पठाण (४८), राजेश शांताराम राजपूत (५०), आनंद पांडेराव देसाई (५३), आनंद काशीनाथ निकाळजे (६४), भिमण्णा बसण्णा नागराल (२७), अक्षय अशोक अवसरमल (२८), सचिन रामचंद्र नेटके (३६) आणि सुरप्पा मनप्पा बंगारी (५५) या नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सर्व मृत फुगेवाडी व दापोडी परिसरातील रहिवासी आहेत. मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले असून व्हिसेरा नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
या प्रकरणात आणखी पाच जणांची प्रकृती गंभीर झाली असून त्यांच्यावर मेडीपॉईंट हॉस्पिटल, औंध तसेच वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुभाष डिग्गीकर, चंदन कुमार, श्रीमंत कोळी, जितू शेदतपुरी आणि प्रकाश राठोड अशी उपचार घेत असलेल्या नागरिकांची नावे आहेत.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत कर्नेलसिंह तखतसिंह विरका, गुरमंगतसिंह कर्नेलसिंह विरका, योगेश रामचंद्र व्हानकडे आणि राधेश्याम हरिराम प्रजापती यांना अटक केली आहे. हे आरोपी फुगेवाडी, मुंढवा आणि उरुळीकांचन परिसरातील रहिवासी आहेत. न्यायालयाने सर्व आरोपींना ८ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच कल्पेश अशोक अग्रवाल याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.
या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागानेही स्वतंत्र कारवाई करत आकाश जाधव, इरफान निसार कुरेशी आणि आर्यन संजय धोत्रे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
विषारी दारू प्रकरणामुळे फुगेवाडी, दापोडी आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून अवैध हातभट्टी दारू व्यवसायांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या घटनेनंतर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.















